शिवसेना आणि भाजपची युती 2019 मध्ये तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्याच दरम्यान, 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून सरकार स्थापन केले होते. यावेळी अजित पवारांनी पहाटे गुपचूप शपथ घेतली होती. त्यानंतर केवळ ८० तास चाललेल्या या सरकारची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली.
आता, त्याच पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, “पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही जाऊ नका. पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही.”
त्यांनी पुढे सांगितले, “मी अजित पवार यांना हेही सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे. मात्र त्यांनी माझं म्हणणं ऐकलं नाही.” धनंजय मुंडे यांनी असंही सांगितलं की, “2019 मध्ये मी त्यांना पहाटेची शपथ घेऊ नका असं स्पष्टपणे सांगितलं होतं, याला सुनील तटकरे साक्षीदार आहेत. मात्र अजितदादांनी माझं म्हणणं न ऐकता ती शपथ घेतली. पण याची शिक्षा मला भोगावी लागली,” असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांनी नुकत्याच एका जाहीर भाषणात हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.